कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा बळी ठरले दोन चिमुकले! कोराडी प्रकल्पाच्या जीवघेण्या खदाणीत बुडून मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू; सुरक्षा कुंपण, सूचना फलक नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि आवेद हे नातेवाईकांसह कोराडी धरण परिसरात गेले होते. या ठिकाणी देऊळगाव माळी, सुलतानपूर आणि लोणार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे प्लांट आहेत. याच परिसरात संबंधित कंत्राटदाराने सुमारे १५ बाय ४५ आकाराची खोल खदाण खोदली होती. काम पूर्ण झाल्यानंतर ही खदाण बुजवणे अथवा तिच्या भोवती सुरक्षिततेच्या दृष्टीने संरक्षक कुंपण उभारणे आवश्यक असतानाही ती उघडीच ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
धरणाचे पाणी या खदाणीत साचल्याने पाण्याची खोली किती आहे, याचा अंदाज येत नव्हता. शनिवारी दोन्ही मुले पाय धुण्यासाठी पाण्यात उतरली. मात्र अचानक खोल पाण्यात गेल्याने ते बुडू लागले. त्यांच्यासोबत असलेल्या शेख आसिफ शेख हुसेन यांनी प्रसंगावधान राखून एका मुलीला सुरक्षित बाहेर काढले. मात्र आयान आणि आवेद यांचा पाण्यात शोध लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरा आयान शेख याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तर आवेद इब्राहिम शेख याचा मृतदेह रविवारी सकाळी पाणबुडी पथकातील कृष्णा लक्ष्मण आगळे व माऊली आगळे (हरशी, पैठण) यांच्या खासगी पथकाने शोधून बाहेर काढला.
कंत्राटदाराने खदाणीच्या ठिकाणी कोणताही सुरक्षा इशारा किंवा सूचना फलक लावला नव्हता, तसेच धोकादायक परिसराला संरक्षक कुंपणही केले नव्हते, असा आरोप पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळेच मुलांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखता आले नाही आणि ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या परिसरात यापूर्वीही दुर्घटना घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र संबंधित विभाग आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या दुर्घटनेप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. याशिवाय, संबंधित ठेकेदाराने विहिरीजवळ घेतलेल्या जॅकवेलसाठी आवश्यक परवानगी घेतली होती का? काम पूर्ण झाल्यानंतर खदाण बुजवण्यात का आली नाही? धोकादायक ठिकाणी सुरक्षा कुंपण आणि सूचना फलक का लावण्यात आले नाहीत? तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या होत्या, याचीही चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दोन निष्पाप बालकांचा जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पीडित कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच कोराडी प्रकल्प परिसरातील धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षक, संरक्षक कुंपण आणि स्पष्ट सूचना फलक तातडीने बसवण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.