शेगावात दोन लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात!;अवैध उत्खनन प्रकरणात मागितली होती पन्नास हजारांची लाच..
Oct 1, 2025, 09:28 IST
शेगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात पन्नास हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन तलाठ्यांना
अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) पथकाने ३० सप्टेंबर रोजी शेगावात अटक केली.
माटरगाव येथील तलाठी अरुण डाबेराव यांनी तक्रारदाराच्या चुलत भावाची जेसीबी व टिपरसह तीन वाहने पकडली होती. ही वाहने अवैध उत्खननासाठी वापरली जात असल्याचे सांगून त्यांनी ती तहसील कार्यालयात जप्त करण्याची धमकी दिली. मात्र कारवाई टाळण्यासाठी डाबेराव यांनी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी १९ हजार रुपये स्वीकारले असून उर्वरित ३१ हजार रुपये दुसऱ्या दिवशी देण्याचे सांगण्यात आले होते.
लाच द्यायची नसल्याने तक्रारदाराने ११ सप्टेंबर रोजी अकोला येथील एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी आरोपी डाबेराव यांनी रक्कम कमी करून २० हजार रुपयांची मागणी केली व ती रक्कम दुसरे तलाठी अमोल गीते यांच्याकडे देण्याचे सांगितले.
यानंतर २२ सप्टेंबर रोजी पुन्हा सापळा रचण्यात आला. मात्र, संशय आल्याने डाबेराव यांनी लाच स्वीकारण्यास टाळाटाळ केली आणि कारवाई अपूर्ण राहिली. अखेरीस सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर, संशय असूनही, ३० सप्टेंबर २०२५ रोजी आरोपी तलाठी अरुण डाबेराव आणि अमोल गीते यांना अटक करण्यात आली.
दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार निवारण अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबी अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपअधीक्षक एसीबी अकोला मिलिंदकुमार अ. बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. प्रवीण वेरूलकर व त्यांच्या पथकाने केली.