पूजा करण्याच्या बहाण्याने साेने व राेख रक्कम लुटणारे दाेघे चार तासातच जेरबंद; १०.४१ लाखांचा एवज जप्त; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची हिवरखेड हद्दीत धडाकेबाज कामगिरी..!

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तुमच्या मुलाच्या जीवाला धाेका आहे. त्यामुळे, पूजा करावी लागेल अशी बतावणी करून महिलेच्या गळ्यातील साेन्याची पाेथ व राेख रक्कम लंपास करणाऱ्या दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासातच जेरबंद केले. या आराेपींकडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन व ब्रेझा कार असा एकूण १० लाख ४१ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपोअ खामगाव श्रेणिक लोढा व अपोअ बुलडाणा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने ३० सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.सुनील उदयभान मुसळे (वय ३९, रा. खांडवा, ता. मोताळा) व संदीप उत्तम महापुरे (वय ३८, रा. खांडवा, ता. मोताळा) असे आराेपींची नावे आहेत. 
आराेपींनी फिर्यादीचे आईस आपण महाराज असल्याचे भासवून तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे असे सांगितले. तसेच त्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून पूजेकरिता तुमच्या गळ्यातील सोन्याची पोथ काढून द्या व एक लोटा द्या, त्यामध्ये ती सोन्याची पोत टाकून कोऱ्या कपड्याने बांधून घ्या व उद्या सकाळी उघडा असे सांगून सोन्याची पाेथ व पूजे करिता पाच हजार रुपये असे घेऊन निघून गेले.आपली फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादी महिलेच्या मुलाने हिवरखेड पाेलिसात तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या चार तासातच या प्रकरणातील तिन्ही आराेपींची ओळख पटविली. त्यापैकी सुनील उदयभान मुसळे व संदीप उत्तम महापुरे यांना अटक केली. या प्रकरणातील अन्य एक आराेपी मात्र फरार आहे. अटक केलेल्या आराेपींकडून २.५ ग्रॅमची सोन्याची पोथ व गुन्ह्यात वापरलेली ब्रेझा कार, दोन मोबाईल फोन असा एकूण १० लाख ४१ हजार ३४० रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे.  
ही कारवाई एपीआय यशोदा कणसे, हेकाॅ राजेंद्र टेकाळे, हेकाॅ अनुपकुमार मेहेर, एनसीपी विजय वारुळे, पाेकाॅ मंगेश सनगाळे, पाेकाॅ राजेश गडकर, पाेकाॅ सतीश नाटेकर, हेकाॅ राजू आडवे व चालक हेकाॅ समाधान टेकाळे यांच्या पथकाने केली. अटक केलेल्या आराेपींना पुढील तपासासाठी हिवरखेड पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.