टुणकी-लाडणापूर रस्त्यावर काळाचा घाला! मालवाहू वाहनाची दुचाकीला भीषण धडक; आईसह ७ महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, दोन गंभीर; संतप्त जमावाने बोलेरो पेटवली, चालकाला बेदम चोप

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : टुणकी-लाडणापूर रस्त्यावर शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. मालवाहू बोलेरो वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात आईसह अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सहा वर्षांचा मुलगा आणि दुचाकीस्वार असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आणि संतप्त नागरिकांनी मालवाहू वाहन पेटवून देत चालकाला चोप दिला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टुणकी-लाडणापूर रस्त्यावर एमपी १२ झेडएच ९३४२ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाची दुचाकीला जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील पूर्वी संजय वासकला (वय ७ महिने, रा. जसुंदी, मध्य प्रदेश) या चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सपना संजय वासकला (वय २६) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात एकाच कुटुंबातील आई आणि चिमुकलीवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातात सनवीर संजय वासकला (वय ६, रा. जसुंदी, मध्य प्रदेश) आणि कमलेश भुरलाल चंगळ (वय ३२, रा. मोरवा, ता. तेल्हारा, जि. अकोला) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, अपघाताची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या भीषण दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने मालवाहू बोलेरो वाहनाला आग लावून दिली. एवढ्यावरच संताप थांबला नाही, तर काही नागरिकांनी वाहनाच्या चालकाला पकडून त्याला चोप दिला.

घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाच्या मारहाणीत चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी प्रथम सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे.आई आणि अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा सोनाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.