दिवसा घरात घुसून महिलेच्या गळ्यातील पोत लुटण्याचा प्रयत्न; चाकूचा धाक दाखवताच आरडाओरड, तरुण धावले अन् चोरटा पसार! वाकोडीत खळबळ
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे भापती संजय काजळे यांचे मोठे बंधू प्रकाश सदाशिव काजळे यांच्या वाकोडी येथील घरात ही घटना घडली. दुपारच्या वेळी अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या कावेरीबाई प्रकाश काजळे (वय ६०) यांच्या गळ्यातील पोत हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
चोरट्याने कावेरीबाईंना चाकूचा धाक दाखवून दागिना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कावेरीबाईंनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून गावातील काही तरुण मदतीसाठी घराच्या वरच्या मजल्याकडे धावले. तरुण येत असल्याचे लक्षात येताच अज्ञात चोरट्याने तेथून पळ काढला. त्यामुळे संभाव्य मोठी अनर्थाची घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरात दिवसाढवळ्या घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दागिना लुटण्याचा प्रयत्न झाल्याने वाकोडी गावासह मलकापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, काजळे परिवाराकडून या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.दिवसा घरात घुसून महिलेच्या गळ्यातील पोत लुटण्याचा प्रयत्न; चाकूचा धाक दाखवताच आरडाओरड, तरुण धावले अन् चोरटा पसार! वाकोडीत खळबळ