ट्रॅक्टरची ट्रायल ठरली महागात! विद्युत खांबाला धडक – १५ वर्षीय बालकाचा मृत्यू; शेगाव तालुक्यातील हिंगणा घुई येथील घटना..!
Sep 19, 2025, 10:29 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगाव तालुक्यातील हिंगणा घुई येथे नवीन घेतलेल्या ट्रॅक्टरची ट्रायल घेणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने तो विद्युत खांबाला धडकला. या भीषण अपघातात १५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.
ही घटना १७ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वाजता घडली.
या प्रकरणी विकास वासुदेव भोजने (वय ५०, रा. घुई नागझरी, ता. शेगाव) यांनी शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, आरोपी प्रशिक राजरत्न भोजने (वय २२, रा. घुई नागझरी) याने गावातील सिद्धार्थ भोजने यांच्याकडून नवीन ट्रॅक्टरची चावी मागवून ट्रॅक्टर चालविण्यास घेतला. मात्र, तो भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून सतिष सहदेव भोजने यांच्या शेतातील झाडास व विद्युत खांबाला धडकला.
या अपघातात ट्रॅक्टरवर बसलेला सार्थक राजेंद्र भोजने (वय १५) गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
शेगाव पोलिसांनी आरोपी प्रशिक राजरत्न भोजने याच्याविरुद्ध कलम २८१, १०६(१) भा.न्या.सं. व कलम १८३ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पो.उपनिरीक्षक संदीप बारींगे करत आहेत.