आंघोळीच्या बहाण्याने तुरीच्या शेतात नेऊन अत्याचार; रायपूर पोलिसांची तासाभरात आरोपीला अटक...

 
पिंपळगाव सराई (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आंघोळीच्या बहाण्याने एका २५ वर्षीय पीडित महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची गंभीर घटना १ जानेवारी २०२६ रोजी सैलानी परिसरात घडली. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पीडित महिलेने रायपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सैलानी येथील रामदास गंगाराम शिंदे (वय अंदाजे ३८ वर्षे) याने पीडित महिलेला ओलांड्यावर आंघोळीला नेतो असे सांगून तिला तुरीच्या शेतामध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.अत्याचारावेळी पीडितेने आरडाओरड केल्याने सैलानी येथील दोन युवक घटनास्थळी धावून आले. त्यांनी पीडित महिलेला आरोपीच्या तावडीतून सोडविले. यावेळी आरोपी रामदास शिंदे हा घटनास्थळावरून फरार झाला.या तक्रारीच्या आधारे पोलीस स्टेशन रायपूर येथे गुन्हा क्रमांक ०१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा नोंद होताच रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने तात्काळ शोधमोहीम राबवली. हेड कॉन्स्टेबल शितोळे, राहुल जाधव, लक्ष्मण शिंदे, काझी, कळमकर, मोरे, चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी अवघ्या एका तासाच्या आत आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेत अटक केली.सदर प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निलेश सोळंके व पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे करीत आहेत. या तत्पर कारवाईमुळे नागरिकांमध्ये रायपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.