टिप्पर वाल्याने केले "एलसीबी"च्या एएसआयचे कांड! १४ हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडून दिले! अकोला ACB ची मलकापुरात कारवाई...
Updated: May 23, 2025, 21:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अकोल्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, २३ मे रोजी मलकापुरात मोठी कारवाई केली. बुलढाणा एलसीबीचा एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा कर्मचारी १४ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला. रेतीची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परवाल्याने या संदर्भात तक्रार दिली होती. गजानन देवचंद माळी (५६) असे जाळ्यात अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मलकापूर नांदुरा रोडवरील शिवनेरी ढाब्यावर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार टिप्पर वाल्याला एप्रिल आणि मे महिन्यात रेतीची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी गजानन माळी याने प्रत्येक ८ हजार असे एकूण १६ हजार रुपयांची मागणी केलेली होती. टिप्पर वाल्यांनी यासंबंधी अकोल्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणी कारवाईत माळी याने तडजोडीअंती १४ हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आज,२३ मे रोजी प्रत्यक्ष सापळा कारवाईत माळी याला १४ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे...