शेतात काम करताना काळाचा घाला! विद्युत खांबाचा शॉक लागून २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुकमधील घटना

 
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतात काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक शिवारात घडली. संतोष संजय चंदनशिव (रा. अंजनी बुद्रुक, ता. मेहकर) असे मृत तरुणाचे नाव आहे. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनी बुद्रुक येथील संजय नामदेव लाड यांच्या शेतात संतोष चंदनशिव काम करत होता. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी शेतातील विद्युत खांबाचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. अवघ्या २५व्या वर्षी त्याचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

डोणगाव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

या घटनेची माहिती संतोषचा चुलत भाऊ अरविंद दिगंबर चंदनशिव यांनी २१ ऑक्टोबर रोजी डोणगाव पोलिसांना तोंडी दिली. या माहितीच्या आधारे डोणगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.संतोषच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचेही अरविंद चंदनशिव यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास डोणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय घिके करीत आहेत. शेतात काम करताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा शेतीच्या कामादरम्यान विद्युत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.