राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घराबाहेर मध्यरात्री थरार! पेट्रोलच्या बाटल्या फेकून कार पेटवली; घर पेटविण्याचाही प्रयत्न, नांदुऱ्यात खळबळ
गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हिंगणे पाटील यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारवर पेट्रोल टाकून आग लावली. पेट्रोलच्या दोन बाटल्यांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एक बाटली कारवर फेकण्यात आली, तर दुसरी बाटली घराच्या दिशेने फेकण्यात आल्याने घरालाही आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आगीमुळे कारचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घर पेटविण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी अंबादास हिंगणे पाटील यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६(एफ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हल्ल्यामागे नेमके कोण?
जिल्हा पातळीवरील राजकीय पदाधिकाऱ्याच्या घराबाहेरच कार पेटवून घरालाही आग लावण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. हा प्रकार वैयक्तिक वादातून झाला की त्यामागे राजकीय कारण आहे, याबाबत सध्या स्पष्टता नाही. हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा शोध नांदुरा पोलिस घेत आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या धक्कादायक प्रकाराचा छडा कधी लागतो, याकडे नांदुरा शहराचे लक्ष लागले आहे.