शेतीच्या हिस्स्यावरून तिघांचा एकावर हल्ला; भावासह तिघांविरुद्ध गुन्हा..!
Oct 6, 2025, 18:31 IST
चांडेळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतीच्या हिस्स्यावरून वाद झाल्याने तिघांनी एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी चांडेळ शिवारात घडली. या प्रकरणी धाड पोलिसांनी भावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या हल्ल्यात चरणसिंग उसारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जखमींची पत्नी ज्योती उसारे यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, चरणसिंग यांच्या वडिलांच्या नावावर गट क्रमांक ३३७ मधील २.५ एकर शेती आहे. या शेतीच्या हिस्सेवाटणीवरून त्यांचा दीर गणेश उसारे यांच्याशी वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी सकाळी ज्योती या शेतात जनावरांना चारा–पाणी देत असताना, त्यांचे पती चरणसिंग झाडे कापत होते.
त्याच वेळी आरडाओरड ऐकू आल्याने त्यांनी धाव घेतली असता, आरोपी गणेश, रामकिसन आणि विशाल हे तिघे मिळून चरणसिंग यांना लाकडी काठी, कुऱ्हाड आणि चापटाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसले. हल्ल्यात गणेशने चरणसिंग यांच्या उजव्या पायावर कुऱ्हाडीने वार केला, तर विशालने बांबूच्या काठीने, आणि रामकिसनने चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे चरणसिंग हे रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडले. ज्योती यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आरोपींना “पतीला मारू नका” असे सांगितले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली.
त्यानंतर त्यांनी आपल्या भावाला भगत मेहेर यांना फोन करून बोलावले. भगत यांनी गंभीर जखमी चरणसिंग यांना उचलून ग्रामीण रुग्णालय, धाड येथे दाखल केले. डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्याचा सल्ला दिल्याने त्यांना नंतर खामगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धाड पोलिसांनी ज्योती उसारे यांच्या तक्रारीवरून गणेश, रामकिसन आणि विशाल उसारे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.