उदयनगर आणि अमडापुरात चोरट्यांचा धुमाकूळ!एकच रात्री ५ दुकाने फोडली....! पोलिसांचा धाक आहे की नाही?
Oct 1, 2024, 08:37 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उदयनगर तसेच अमडापूर येथे चोरट्यांनी हैदोस घालत असून एकाच रात्री पाच दुकाने फोडली आहे. ४६ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २९ सप्टेंबर च्या रात्री घडली. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमडापूर येथील कृषी भूषण एजन्सी हार्डवेअरच्या काउंटर मधून चोरट्यांनी २ हजार ७०० रुपये, प्रभात किराणा दुकानातून आठ हजार पाचशे रुपये, त्रिमूर्ती जनरल स्टोअरमधून १२ हजार, जय गजानन मोटर रिवायडिंग दुकानातील तांब्याची तार किंमत अंदाजे १३ हजार ५०० रुपये तसेच उदयनगर येथील देशी दारूचे दुकान फोडून दहा हजार रुपये रोख असा एकूण ४६ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज राठोड हे करीत आहेत.