देऊळगाव मही शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ! शेतातून २५० किलो सोयाबीन लंपास; लोखंडी जाळीचे कंपाउंड तोडून चोरट्यांचा डल्ला

 
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही शिवारात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल २५० किलो सोयाबीन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. शेतमाल घरी नेण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्याला या चोरीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी शेतातील लोखंडी जाळीचे कंपाउंड तोडून सोयाबीनच्या चार पोत्यांवर डल्ला मारला.

 

लोखंडी जाळीचे कंपाउंड तोडले, चार पोती सोयाबीन पळवले!

देऊळगाव मही येथील रामदास पाटील शिंगणे (वय ८२, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा) यांच्या शेतात सोयाबीनची मळणी करण्यात आली होती. मळणी पूर्ण झाल्यानंतर सोयाबीन चार पोत्यांमध्ये भरून शेतात ठेवण्यात आले होते. हा शेतमाल घरी नेण्यासाठी वाहन आणण्याच्या तयारीत शेतकरी असतानाच अज्ञात चोरट्यांनी संधी साधली.चोरट्यांनी शेतातील लोखंडी जाळीचे कंपाउंड तोडून सोयाबीनची चार पोती लंपास केली. चोरीला गेलेल्या सोयाबीनचे वजन सुमारे २५० किलो असून, त्याची अंदाजे किंमत २० हजार रुपये आहे. कष्टाने पिकवलेला आणि मळणी करून घराकडे नेण्याच्या तयारीत असलेला शेतमाल चोरीला गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेची माहिती पोलिसांना १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास देण्यात आली. त्यानंतर रामदास शिंगणे यांच्या तक्रारीवरून २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत. चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, शेतमालाची चोरी करणारे चोरटे कोण, त्यांनी ही चोरी नेमकी कशी केली आणि चोरीचा माल कुठे नेला, याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे.