डायल ११२ वर चोरांची खोटी माहिती; पोलिसांना बोलावून तरुणाचीच पंचाईत! गावात चोरी झालीच नव्हती; “घरी कोणी नसल्याने” पोलिसांना फोन केल्याची कबुली, बोराखेडी पोलिसांकडून गुन्हा दाखल...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ या क्रमांकाचा गैरवापर करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. गावात चोर आल्याची खोटी माहिती पोलिसांना देत त्यांना घटनास्थळी बोलावून घेणाऱ्या तरुणाविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गावात चोरी झालीच नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली.

मलकापूर तालुक्यातील आणि बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा येथे १ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८:२३ वाजता डायल ११२ वर फोन आला. गावात चोर आल्याची माहिती कॉल करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना दिली. आपत्कालीन कॉलची तत्काळ दखल घेत रात्रगस्तीवर असलेले पोलीस अंमलदार अमोल खराडे, सहप्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू आणि चालक वैभव खरमाळे शासकीय वाहनाने पिंपळखुट्याकडे रवाना झाले.

तब्बल रात्री ९:१४ वाजता पोलीस पथक गावात पोहोचले. त्यानंतर डायल ११२ वर कॉल करणाऱ्या शुभम रमेश उमाळे (वय २५) याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र, गावात कोणतीही चोरी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान शुभम उमाळे याने घरी कोणी नसल्याने पोलिसांना खोटी माहिती देऊन बोलावून घेतल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार अमोल खराडे यांच्या तक्रारीवरून शुभम उमाळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.