रायझिंग मेन पाइपलाइनला चोरट्यांचा घाला! जलसंपदा विभागाचे तब्बल २.१३ लाखांचे चार एअर वॉल लंपास; शेगावात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल...
जलसंपदा विभागामार्फत शेतीच्या सिंचनासाठी जिंगाव उपसा सिंचन योजना क्रमांक ७ अंतर्गत भूमिगत रायझिंग मेन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. याच पाइपलाइनवरील प्रत्येकी ५३ हजार ३२२ रुपये किमतीचे चार एअर वॉल अज्ञात चोरट्यांनी पळविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाचे उपअभियंता रामेश्वर गणेशराव ठाकरे (वय ५२, रा. अकोला) यांना १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्यापूर्वी या चोरीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, वरवट रोडवरील बोर्ड परिसरापासून शेगावच्या दिशेने जाणाऱ्या रायझिंग मेन पाइपलाइनवरील चार एअर वॉल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
सिंचनासाठी उभारण्यात आलेल्या शासकीय यंत्रणेवरील महत्त्वाचे साहित्यच चोरीला गेल्याने जलसंपदा विभागाच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आता पोलिसांच्या तपासातून या चोरीमागील आरोपी कोण आहेत आणि चोरीचे एअर वॉल नेमके कुठे नेण्यात आले, याचा उलगडा होण्याची प्रतीक्षा आहे.