गावागावात चोरट्यांचा धुमाकूळ! दोन शेतकऱ्यांचे गोडावून फोडून २.५ लाखांचा माल लंपास...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील घुस्सर आणि नांदुरा तालुक्यातील टाकरखेड परिसरात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांचे गोडावून फोडून तब्बल २ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा शेतमाल आणि रोख रक्कम लंपास केल्याची दोन स्वतंत्र प्रकरणे उघडकीस आली आहेत. या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना मोताळा तालुक्यातील घुस्सर शिवारातील गट नं. १२ मधील आहे. येथील राजेंद्र वासुदेव पाटील (रा. चाळीस बिघा, मलकापूर) यांच्या शेतातील गोडावूनमधून  ९ ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एवज लंपास केला  . त्यांनी गोडावूनमधून ५ क्विंटल तिळ (३२,५०० रुपये), इतर शेतमाल (३७,५०० रुपये), ३ हजार रुपये रोख, ५०० रुपयांचे फिल्टर मशिन आणि १ हजार रुपयांचा जुना टीव्ही असे एकूण ७४ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरून नेले.

तर दुसरी घटना नांदुरा तालुक्यातील टाकरखेड (शिवार डौलखेड गट नं. ३५) येथे घडली. येथील जयपालसिंग श्रीधरसिंग जाधव यांच्या गोडावूनमधून ६ ते ७ नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी मोठा हात मारला. जाधव यांच्या गोडावूनमध्ये सुधाकर सुरडकर यांनी ठेवलेला २० क्विंटल कापूस (१ लाख ४० हजार रुपये), तसेच फिर्यादी जाधव यांचा गहू (६ हजार), मुग (२८ हजार), उडीद (२ हजार), चराटाचे बंडल (२ हजार) आणि लोखंडी साहित्य (२ हजार) असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या दोन्ही प्रकरणांवरून बोराखेडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.