लग्नसराईत ‘हळदी’वर चोरट्यांची नजर! डोणगावात ३० क्विंटल बेणे लंपास....
May 6, 2026, 11:44 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, प्रत्येक विवाहसोहळ्यात ‘हळद’ हा महत्त्वाचा पारंपरिक घटक असताना, डोणगाव येथे हळदीच्या बेण्यावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी कोठार फोडून तब्बल ३० क्विंटल हळदीचे बेणे लंपास केले असून, सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विठ्ठल विश्वनाथ भुतेकर (वय ४४, रा. डोणगाव) यांनी पेरणीसाठी विकत आणलेले हळदीचे बेणे राजेश रमेश सावजी यांच्या कोठारात साठवून ठेवले होते. ४ मे रोजी सायंकाळी सहा ते ५ मे रोजी पहाटे साडेपाच या कालावधीत चोरट्यांनी कोठाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि प्रति क्विंटल तीन हजार रुपये दराने ३० क्विंटल हळदीचे बेणे लंपास केले.
या प्रकरणी ५ मे रोजी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अरुण सानप हे ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
दरम्यान, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर हळदीची मागणी वाढलेली असताना ही चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शेतीसाठी साठवलेले बेणे चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अलीकडील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.