पुरातन मारोती मंदिरात चोरट्यांनी केला हात साफ; १ किलो ४५० ग्रॅम चांदीचे दागिने लंपास! पलसोडा महासिद्ध येथील घटना
पोलीस सूत्रांनुसार, चोरट्यांनी मंगळवारी रात्री मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी ३५० ग्रॅमचा चांदीचा हार, ३०० ग्रॅमचा कंबरपट्टा आणि सुमारे ८०० ग्रॅमचे गदा व हात-पायातील ५ कडे असा एकूण १.४५ किलो चांदीचा ऐवज चोरून नेला. या धाडसी घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे,याआधीही १४ जानेवारीला तिळसंक्रांती दिवशी सातपुड्याच्या वारीतील प्रसिद्ध हनुमान पिठात अशीच चोरी झाली होती, ज्यात ५ किलो ४५० ग्रॅमचे दागिने चोरीला गेले होतेआणि त्या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्ण आहे.
चोरीची माहिती मिळताच बुलडाणा येथून श्वान पथक दुपारी १२ वाजता दाखल झाले, मात्र त्यांनी ठोस माग काढू शकला नाही.
ठसेतज्ज्ञ सपोनि कांबळेयांनी ठसे गोळा केले आहेत. तसेच मलकापूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक लांडे, तसेच सोनाळा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
पोलीसांनी तपास युद्धपातळीवर सुरू केला असून, परिसरातील अनेक CCTV फुटेज तपासणी व लोकांची विचारपूस सुरू आहे.