मालकापुरात चोरट्यांचा हैदोस, तीन दुकाने फोडली! रोख रकमेसह ऐवज केला लंपास, सीसीटीव्हीत कैद झाली चोरट्यांची हालचाल...

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूर शहरात रविवारी पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास चोरट्यांनी हैदोस घालत तब्बल तीन दुकाने फोडली. या दुकानातील रोख रकमेसह ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी नंदलाल केशवजी दोषी यांच्या ‘गड्डे की दुकान’ या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सुमारे १५ हजार रुपये आणि काजू-बदामसह मालावर हात साफ केला. त्याचप्रमाणे सुखकर्ता हॉस्पिटलजवळील मेडिकल दुकानाचे शटर उचकून सुमारे पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली.
तसेच राज डेअरी डेली नीडस या निलेश अग्रवाल यांच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी सहा ते सात हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
संपूर्ण चोरीचा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. वारंवार घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.