उघडं घर पाहून चोरट्याचा डल्ला! साडेचार लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास...

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील रामगाव तांडा येथे उघड्या घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ५ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरीमध्ये साडेचार लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे रामगाव तांडा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रामगाव तांडा येथील बाबुराव पुंडलीक मारकड यांच्या घरी २१ सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपासून ते २२ सप्टेंबरच्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. घर उघडे असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ४ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा मोठा ऐवज चोरून नेला.

चोरट्याने प्रत्येकी १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चार बादामी अंगठ्या, ज्यांची किंमत सुमारे ६० हजार रुपये, ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी १० हजार ५०० रुपये, तसेच ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ९ हजार रुपये, असा सोन्याचा ऐवज लंपास केला. याशिवाय ६० तोळे वजनाचे चांदीचे दोन कडे १२ हजार रुपये आणि ६० तोळे वजनाच्या चांदीच्या दोन गुंडवळ्या १२ हजार रुपये, असा मुद्देमालही चोरीला गेला.

अशाप्रकारे रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून एकूण ५ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी बाबुराव मारकड यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकांत चिटवार करीत आहेत.