वाहनातून बॅटऱ्या लंपास करणारा चोरटा गजाआड अंढेरा पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर आणि टिप्परच्या तीन बॅटऱ्या जप्त..!

 
 अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : उभ्या वाहनांमधील बॅटऱ्या लंपास करणाऱ्या चोरट्यास अंढेरा पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी गजाआड केले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या तिन्ही बॅटऱ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत डिग्रस येथील तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद विठोबा मांटे आणि अनंता मांटे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरच्या दोन बॅटऱ्या तसेच मनिष वाघ यांच्या अशोक लिलँड टिप्परची एक बॅटरी अज्ञात चोरट्यांनी १७ सप्टेंबरच्या रात्री लंपास केली होती.याबाबत प्रल्हाद मांटे यांनी १८ सप्टेंबर रोजी अंढेरा पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानुसार ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गणेश भिकाजी हुसे (रा. डिग्रस, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) याचा शोध घेण्यात आला.१९ सप्टेंबर रोजी तो चोरीस गेलेल्या बॅटऱ्यांसह गावातच सापडला. पंचासमक्ष तिन्ही बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सुरेश जारवाल, बिट जमादार मारोती कायंदे, पो.कॉ. सिद्धार्थ सोनकांबळे, पंढरी नेमाने, नितीन फुसे व अमोल थोरे यांनी केली.