ते देवदर्शनासाठी गेले अन् इकडे घरी भलतंच घडलं..! घटना सीसीटीव्हीत कैद; मोताळा येथील घटना...

 
 मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूप कोंडा तोडून घरातून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी ८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोताळ्यातील प्रभाग क्र. १ मधील आदर्शनगर उघडकीस आली...

मोताळा येथील प्रभाग क्र. १ मधील आदर्श नगर मध्ये राहत असलेले देविदास गोंड हे दर शनिवारी पळशी सुपो येथे दर्शनासाठी जात असतात नेहमीप्रमाणे शनिवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास देविदास गोंड हे घराला कुलूप लावून पळशी सुपो येथे गेले. मध्यरात्री त्यांच्या गेटचे आणी घराच्या दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटाचे लॉक तोडून त्यामधील नगदी रोख अंदाजे १५ हजार रुपये तसेच सोन्याची गहुपोत, शिंपले १४ ग्रॅम, सोन्याच्या दोन अंगठ्या ९ ग्रॅम, एकदाणी पोत ८ ग्रॅम, कानातले सोन्याचे ५ ग्रॅम, मणी पोत व मंगळसूत्र ११ ग्रॅम असे अंदाजे ४७ ग्रॅम सोन्याचे दागिनेचोरट्यांनी लंपास केले आहे.
चोरटा सीसीटीव्हीत कैद 
 देविदास गोंड यांच्या घरी चोरी करण्यासाठी मध्यरात्री अंदाजे अडीच वाजेच्या सुमारास तीन चोरटे दुचाकीवर आले त्यापैकी एका चोरट्याने लोखंडी टॉमी ने गेटचा कुलुप कोंडा तोडला त्यानंतर दोघांनी चोरी करण्यासाठी घरात प्रवेश केला. एक चोरटा घराबाहेर लक्ष ठेऊन होता चोरट्यांच्या या सर्व हालचाली घरावर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.