"मदत" करायला आले... अन् क्षणात गायब झाले कार्ड! दुसऱ्या दिवशी खातं तपासलं तर उडाले ७० हजार! मलकापूरची घटना...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना रामराव माहुरे (वय ३०, रा. रामवाडी, मलकापूर) या दुधलगाव येथे ग्रामसेविका म्हणून कार्यरत आहेत. २९ जून रोजी सायंकाळी त्या मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या.
व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एटीएममध्ये उपस्थित असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना "व्यवहार पूर्ण झालेला नाही, पुन्हा कार्ड मशीनमध्ये टाका," असे सांगून मदतीचा आव आणला. त्यानंतर त्यांनी हातचलाखीने अर्चना माहुरे यांचे एटीएम कार्ड बदलल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून रक्कम वजा झाल्याचे संदेश येऊ लागल्यानंतर त्यांनी खात्याची पडताळणी केली. त्यावेळी २९ जूनच्या सायंकाळपासून ३० जूनच्या सकाळपर्यंत मुक्ताईनगर आणि बऱ्हाणपूर येथील एटीएममधून सात व्यवहारांद्वारे प्रत्येकी १० हजार रुपये, असे एकूण ७० हजार रुपये काढण्यात आल्याचे उघड झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अर्चना माहुरे यांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, एटीएममध्ये अनोळखी व्यक्तींकडून मदत घेणे टाळावे, एटीएमचा पिन कोणालाही सांगू नये तसेच व्यवहारादरम्यान संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ बँक आणि पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.