पुरामुळे उपचारच मिळाले नाही; सर्पदंशाने महिलेचा मृत्यू! लाेणार तालुक्यातील पहूर येथील दुर्दैवी घटना!

 
 लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लाेणार शहरासह तालुक्यात २१ जुलै राेजी ढगफुटीसदृश्य पाउस झाला. त्यामुळे, नदी,नाल्यांना पूर आला हाेता. अशातच लाेणार तालुक्यातील पहूर येथे एका ५५ वर्षीय महिलेला सर्पदंश झाला हाेता. मात्र, पुरामुळे या महिलेला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला. सिंधूताई शंकर मुंढे (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. 
सिंधूताई मुंढे या घराचे दरवाजे उघडे ठेवून झोपल्या होत्या. जोरदार पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला होता. याच दरम्यान, आडोशाच्या शोधात आलेल्या सर्पाने अंथरुणात प्रवेश करून दंश केल्याचा अंदाज आहे. सर्पदंश लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना मेहकर येथील रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला; मात्र पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे सर्व मार्ग बंद झाले होते. परिणामी वेळेत उपचार मिळू न शकल्याने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. निसर्गनिर्मित अडथळ्यांमुळे एका निष्पाप महिलेचा जीव गमावावा लागल्याची हळहळ ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.