पोलिसांचा धाक उरला नाही; खामगावात चोऱ्यांचे सत्र थांबत नाही! मध्यरात्री घराचे कुलूप तोडले अन् साडेपाच लाखांचा माल दामटला..

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मागील काही दिवसांपासून सुरू असलेले चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. शेगाव रोडवरील राणा लकी शाळेजवळील घर फोडून चोरट्यांनी सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह साडेपाच लाखांचा ऐवज पळविला. आज ही घटना उघडकीस आली.
शहरातील दस्तलेखक आशिष सतीश जयस्वाल (२७) यांचे शेगाव रोडवर घर आहे. चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटाचे दार उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात
आली. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, डीवायएसपी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी जयस्वाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (१), ३३१ (४), ३०५ नुसार गुन्हे दाखल केले.
मागील काही दिवसांपासून शहर परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गत आठ दिवसांत जिल्हयात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहे. चोरट्यांनी जिल्हयात धुमाकूळ घातला असून पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सातत्याने घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.