'बसमध्ये महिलांची गर्दी... अन् क्षणात गायब झाले ६० हजारांचे सोन्याचे दागिने! खामगाव– मलकापूर एसटी प्रवासात महिलेचा धक्कादायक अनुभव'

 
मलकापूर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या पर्समधील तब्बल ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मलकापूर शहरात घडली. काही महिला बसमध्ये चढल्यानंतर झालेल्या गोंधळात हा हातसफाईचा प्रकार घडल्याचा संशय असून या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनी मधुकर उगळे (वय ४४, रा. पळशी बुद्रुक, ता. खामगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार त्या आपल्या जाऊ साधना उगळे यांच्यासह खामगावहून धुळे येथे जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करत होत्या. सकाळी सुमारे ११ वाजता त्या बसमध्ये चढल्या. त्यांच्या हातातील बॅगमध्ये एक छोटी पर्स होती. त्या पर्समध्ये दोन ग्रॅम वजनाची सोन्याची पॉलीश असणारी पट्टी-पोत (अंदाजे किंमत २० हजार रुपये) तसेच चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके (अंदाजे किंमत ४० हजार रुपये) असे एकूण ६० हजार रुपयांचे दागिने ठेवले होते.

दरम्यान, नांदुरा येथे काही महिला बसमध्ये चढल्यानंतर मोठी गर्दी झाली. या गर्दीत काही महिला त्यांच्या बॅगजवळ घोळका करून उभ्या असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर बस मलकापूर येथील लक्ष्मीनगर परिसरात पोहोचल्यानंतर रजनी उगळे या बसमधून उतरल्या. काही वेळाने त्यांनी बॅग तपासली असता पर्समधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत दागिने चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बसस्थानक व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती आहे.एसटी बसमधील वाढती गर्दी आणि त्याचा फायदा घेणाऱ्या हातचलाख चोरट्यांमुळे प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.