सोलर पॅनल प्लेट्सची चोरी; मोहना खुर्द शिवारात शेतकऱ्यांमध्ये भीती! आधी स्प्रिंकलर पाईप, आता सोलर प्लेट्स; सलग चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली..
Oct 8, 2026, 17:04 IST
मेहकर (गणेश ताकतोडे: बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर तालुक्यातील मोहना खुर्द येथील शेत शिवारात अज्ञात चोरट्यांनी सोलर पॅनलच्या प्लेट्स चोरून नेल्याची घटना ६ ऑक्टोबरच्या रात्री घडली. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, शेतातील महागडे साहित्य सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहना खुर्द शिवारातील शेतात बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलच्या प्लेट्सवर चोरट्यांनी डल्ला मारला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी हे साहित्य लंपास केले. सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
मोहना खुर्द परिसरात शेतातील साहित्य चोरीला जाण्याची ही पहिलीच घटना नसल्याचे समोर आले आहे. यापूर्वी मोहना खुर्द, जनुना तसेच शेंदला शिवारातून शेतकऱ्यांचे स्प्रिंकलर पाईप चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतातील उपकरणांना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान
एकामागून एक घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. रात्रीच्या वेळी शेतात असलेले सोलर पॅनल, मोटार, स्प्रिंकलर पाईप आणि अन्य शेती साहित्य सुरक्षित ठेवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.परिसरात रात्रीची गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा घालावा, तसेच सोलर पॅनल व स्प्रिंकलर पाईप चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.