पत्नीची भेट अधुरीच; भरधाव दुचाकी घसरल्याने डोणगावचा युवक ठार,विठ्ठलवाडी गावाजवळील घटना
Sep 22, 2025, 10:36 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव दुचाकी घसरल्याने डोणगाव येथील ३० वर्षीय युवक जागीच ठार झाला.
गरोदर पत्नीला भेटण्यासाठी निघालेल्या युवकावर काळाने घाला घातल्याने पत्नीची भेट अधुरीच राहिली.हा अपघात २० सप्टेंबर रोजी रात्री विठ्ठलवाडी जवळ घडली.
रुपेश दशरथ करवते असे मृतक युवकाचे नाव आहे.
मूळचा अकोला जिल्ह्यातील निम्मी गावचा असलेला रुपेशचे वडील दशरथ करवते मेहकर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने कुटुंबीय येथे स्थायिक झाले होते. अभियंता असूनही एडिटिंगमध्ये आवड असल्याने रुपेशने या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.
२० सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता तो पत्नीला भेटण्यासाठी अकोला जिल्ह्यातील नवेगावकडे निघाला होता. विठ्ठलवाडीजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडाला धडक बसली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला.
रुपेशची पत्नी आठ महिन्यांची गरोदर असून दीड महिन्यात त्यांच्या घरात बाळाच्या आगमनाचा आनंद साजरा होणार होता. मात्र रुपेशच्या अकाली मृत्यूमुळे करवते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजून जन्मालाही न आलेल्या बाळाच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.