पत्नी फोनवरून चोरून मित्राशी बोलायची! लग्नानंतर अवघ्या १२ व्या दिवशी तलाठ्याने उचलले टोकाचे पाऊल.......

 
बीड (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): लग्नानंतर अवघ्या १२ दिवसांत एका तरुण तलाठ्याने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मृत तलाठ्याच्या आईच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पत्नीचे कथित प्रेमसंबंध आणि त्यातून झालेला मानसिक त्रास हेच मुलाच्या टोकाच्या निर्णयामागील कारण असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दत्तू कोळी (रा. मोरेवाडी, अंबाजोगाई) यांनी राहत्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांची आई सुनंदा दत्तू कोळी यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, गणेश यांचा विवाह १३ मे रोजी बीड येथील एका तरुणीसोबत झाला होता. लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले असताना पत्नीचे वर्तन संशयास्पद वाटू लागले. ती वारंवार कोणाशीतरी लपूनछपून मोबाईलवर बोलत असल्याचे गणेश यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा देखील करण्यात आली; मात्र पत्नीच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही, असा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
याचदरम्यान पत्नीने हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगितले आणि गणेश यांच्यासोबत राहण्यास नकार देत अंबाजोगाईला परत गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
 डायरीतील नोंदींमुळे उघड झाले कथित प्रेमसंबंध?
२४ मे रोजी गणेश पत्नीला भेटण्यासाठी अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या बहिणीला फोन करून पत्नीचे दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच त्या संबंधाबाबतच्या काही नोंदी पत्नीच्या डायरीत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
फिर्यादीनुसार, डायरीतील नोंदी वाचल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर काही वेळातच पत्नी राहत असलेल्या खोलीत गणेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली.
आईच्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध गुन्हा...
मुलाच्या मृत्यूस पत्नीचे वर्तन, कथित अनैतिक संबंध आणि मानसिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप करत सुनंदा कोळी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पत्नीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
पोलीस शिपायापासून तलाठीपदापर्यंतचा संघर्षमय प्रवास...
गणेश कोळी यांची २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) पोलीस शिपाई म्हणून नियुक्ती झाली होती. नोकरी सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि २०२४ मध्ये तलाठी भरती परीक्षेत यश मिळवत चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, मृताची पत्नी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.