

बुलडाणा जिल्ह्यात मार्च महिन्यात ७ जणांचा दुर्दैवी "दी एन्ड"! मृतदेह सापडले पण....
Mar 28, 2025, 16:27 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): त्यांचे मृतदेह सापडले पण त्यांचे कुणी नातेवाईक सापडले नाहीत. ज्यांचे मृतदेह सापडले त्यांची ओळखही पटलेली नाही..होय, बुलडाणा जिल्ह्यात मार्च महिन्यात २८ तारखेपर्यंत अशा ७ जणांचा दुर्दैवी दी एन्ड झाला आहे..
बुलडाणा जिल्हा पोलिसांना १ मार्च ते २८ मार्च दरम्यान ७ अनोळखी मृतदेह आढळून आले आहेत. सातही मृतदेह पुरुष जातीचे आहेत.त्यातील एक वगळता उर्वरित सहाही पन्नाशीच्या आतील असावेत असा अंदाज आहे. तिघांचे मृतदेह रेल्वेलाईन वर सापडले आहेत..
२ मार्चला नांदुरा ते जलंब रेल्वे लाईनवर पोल क्रमांक ५२३/२४ जवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला. ७ मार्चला चिखली पोलिसांना भोकरवाडी शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.८ मार्चला शेगावच्या सईबाई मोटे रुग्णालयात एका तरुणाचा मृत्यू झाला,मात्र अद्याप तरुणाची ओळख पटली नाही. २० मार्चला नांदुरा ते जलंब स्टेशनच्या मधात रेल्वे लाईन वर एका वृद्धाचा मृतदेह आढळला. २३ मार्चला नांदुरा ते चांदुर बिस्वा ब्रीज च्या मधात रेल्वे लाईन वर एक मृतदेह आढळला. २६ मार्चला शेगाव येथील जुन्या बस स्टैंड वर एका पुरुषाचा मृतदेह आढळला.काल,२७ मार्चला गौलखेड ते शेगाव रोड वर एकाचा मृतदेह आढळला..