तहसीलदारांच्या पथकाने पकडलेले ट्रॅक्टर चालकाने नेले पळवून; पारखेड फाटा येथील घटना; जानेफळ पोलिसांना तहसीलदारांचे पत्र...

 
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुरमाचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणारे ट्रॅक्टर तहसीलदार निलेश मडके यांच्या पथकाने 18 डिसेंबर रोजी सायंकाळी जप्त केले होते. पथक पंचनामा करीत असताना असतानाच चालकाने टॅक्टर तेथून पळवून नेले. त्यामुळे,या ट्रॅक्टरच्या चालक व मालकावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार मडके यांनी 18 डिसेंबर रोजी पत्र दिले आहे. 

तहसीलदार निलेश मडके यांना पारखेड फाटा परिसरात मुरमाचे अवैध उत्खनन करून वाहतुक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली असता एका ट्रॅक्टरमधून मुरमाची वाहतुक सुरू असल्याचे आढळले. चालकाना परवाना मागितला असता त्याच्याकडे आढळला नाही. त्यामुळे हे ट्रॅक्टर जप्त करण्याची प्रक्रीया तहसीलदारांच्या पथकाने सुरू केली होती. तसेच पंचनामा सुरू असतानाच ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळवून नेले. त्यामुळे, पथकाला हे ट्रॅक्टर जानेफळ पोलिस स्टेशनला लावता आले नाही. अखेर 18 डिसेंबर रोजी तहसीलदार मडके यांनी जानेफळ पोलिसांना पत्र देवून ट्रॅक्टर मालक आणि चालकावर कारवाई करावी असे म्हटले आहे. दरम्यान, रेती माफीया आता तहसीलदारांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे.