चिखली–लव्हाळा रस्त्यावर रोड रॉबरीचा थरार; रस्ता अडवून वाहनांवर दगडफेक; साखरखेर्डा पोलिसांचा रात्रभर कडेकोट बंदोबस्त...

 
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली–मेहकर मार्गावरील लव्हाळा नजीकच्या पाटोदा फाट्यावर अज्ञात चोरट्यांनी रस्ता अडवून वाहनांवर दगडफेक करत रोड रॉबरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेत दहा ते पंधरा वाहनांच्या काचा फुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, चोरट्यांनी पाटोदा फाट्यावर हायवेवर दगड टाकून तसेच प्रवासी निवाऱ्यातील बाकडे आडवे ठेवून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत गाड्या न थांबवता वेगात पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, प्रवासी निवाऱ्याच्या आडून जाणाऱ्या वाहनांवर जोरदार दगडफेक करण्यात आली.

याच वेळी सैलानी येथे दर्शनासाठी जात असताना साखरखेर्डा येथील बाबुसेठ कुरेशी यांच्या चारचाकी वाहनाचे टायर फुटले. मात्र वाहनात क्रूझरमध्ये ८ ते १० जण असल्याचे दिसताच चोरट्यांचा रॉबरीचा प्रयत्न फसला.
घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक परिहार यांच्यासह साखरखेर्डा, चिखली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रभर परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र चोरटे फरार झाले.
दरम्यान, रोड रॉबरीचा प्रयत्न फसल्याने चोरटे आजूबाजूच्या गावांमध्ये चोरीचा प्रयत्न करू शकतात, या शक्यतेने ठाणेदार गजानन करेवाड यांनी परिसरातील पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पाटोदा रस्त्यावरील सवडद येथील ग्रामविकास अधिकारी गौतम गवई यांच्या शेतातून कोंबड्या, एक क्विंटल कापूस व सोयाबीन चोरीला गेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला असून त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी रात्रभर तळ ठोकून बंदोबस्त ठेवल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र जिल्ह्यात वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पारदर्शक कारभाराला चोरट्यांनी जणू खुले आव्हान दिल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहन थांबवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.