चोरट्यांची पोलिसांना सलामी; पोलीस वसाहतीतील पाच घरे फोडली; अंदाजे २० लाखांचा एवज केला लंपास; बुलढाणा शहरातील घटना...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरात चोरट्यांची हिंमत वाढतच असून थेट पोलिसांच्या वसाहतीतच चोरट्यांनी हैदोस घालत पाच घरे फोडली. चोरट्यांनी 20 लाख रुपयांचा एवज लंपास केला. शहरातील चिखली रोडवरील देवी मंदिराजवळ असलेल्या बुलढाणा पोलीस वसाहतीत शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. वर्दळ असलेल्या पोलीस वसाहतीत चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. 
चोरट्यांनी एएसआय वारे, पोलिस कॉन्स्टेबल रुबीना पटेल, जितेंद्रसिंग ठाकूर यांच्यासह इतरांच्या घरांना टार्गेट केले. घरांमधून रोख रक्कम व दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, चोरीची ही घटना पोलिस अधीक्षक कार्यालय व ग्रामीण पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर घडली असून, त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलिस करीत आहेत.