देऊळगाव माहित चोरट्यांचा धुमाकूळ! कृषी साहित्य दुकानाचे शटर तोडून ₹१.९० हजारांची रोकड लंपास

 
 देऊळगाव राजा :(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे अज्ञात चोरट्यांनी कृषी साहित्याच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटून तब्बल ₹१ लाख ९० हजारांची रोकड लंपास केल्याची धाडसी घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नामदेव शिंगणे (वय ५७) हे देऊळगाव मही येथे 'जिजाऊ अॅग्रो एजन्सी अँड इलेक्ट्रिक' या नावाने कृषी साहित्याचे दुकान चालवतात. शनिवारी (२६ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी प्रस्थान केले. त्यानंतर मध्यरात्री ते रविवारी (२७ जुलै) पहाटे पाच वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर उचकटून आत प्रवेश केला.

दुकानातील पिशवीत ठेवलेली ₹१ लाख ९० हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास करून घटनास्थळावरून पसार झाले. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर देऊळगाव राजा पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

दरम्यान, देऊळगाव मही व परिसरात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.