भरधाव कंटेनर समोरच्या वाहनावर धडकला, चालक जागीच ठार; समृद्धी महामार्गावर चॅनेल नंबर २७३ वर अपघात..!

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :भरधाव कंटेनर समोरच्या वाहनावर धडकल्याने चालक जागीच ठार झाला.
ही घटना समृद्धी महामार्गावर चॅनेल नंबर २७३ वर नागपूरकडे जाताना १ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.हनीफ खान (वय ४५, रा. चिबूर मेवात, हरियाणा) असे मृतकाचे नाव आहे.
समृद्धी महामार्गाने एनएल-०१-एए-८०१८ क्रमांकाचा कंटेनर मुंबईकडून नागपूरच्या दिशेने निघाला होता. १ सप्टेंबरच्या पहाटे चॅनेल नंबर २७३ जवळ आल्यानंतर चालक हनीफ खान याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर समोरील अज्ञात 
वाहनावर धडकले. यावेळी केबिनचा चुराडा झाला. त्यातच चालक स्टेअरिंगमध्ये अडकून गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला. समोरील वाहन अपघातानंतर फरार झाले.
घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीसचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप इंगळे
दीपक पिटकर, एएसआय विठ्ठल खोडे, योगेश शेळके यांच्यासह क्यूआरटीम दाखल झाली. क्रेन बोलावून स्टेअरिंगमध्ये अडकून ठार झालेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर समृद्धीवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.