पायी दिंडीतून परतताना जवानाचा दुर्दैवी अंत; धावत्या ट्रॅक्टरवरून दुसऱ्या ट्रॅक्टरवर चढताना अपघात; एमएसएफ जवान ठार...
Jan 29, 2026, 13:51 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पायी दिंडीत सहभागी झालेल्या एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा बल) या सुरक्षा दलातील जवानाचा घराकडे परतत असताना ट्रॅक्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शेगाव येथील आनंद सागर परिसरात मंगळवार, २७ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता ही हृदयद्रावक घटना घडली.महेश गजानन व्यवहारे (वय २५) असे मृतक जवानाचे नाव आहे.
मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील सुमारे ७० ते ८० भाविकांची पायी दिंडी २३ जानेवारी रोजी शेगावकडे रवाना झाली होती. २७ जानेवारी रोजी शेगाव येथे पोहोचल्यानंतर भाविकांनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर परतीच्या मार्गावर सर्व भाविक ट्रॅक्टरमधून विठ्ठलवाडीच्या दिशेने निघाले होते.
दरम्यान, विठ्ठलवाडी येथील एमआयडीसी परिसरात कार्यरत असलेला एमएसएफ जवान महेश गजानन व्यवहारे हा शेगावच्या आनंद सागर परिसरात धावत्या मागील ट्रॅक्टरवरून समोरील ट्रॅक्टरवर चढत असताना पाय घसरून खाली पडला. तो थेट ट्रॅक्टरखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे विठ्ठलवाडी गावावर शोककळा पसरली असून, जवानाच्या अकाली मृत्यूने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. घटनेनंतर गावात एकही चूल पेटली नसून सर्वत्र शोकमय वातावरण आहे.