२५ मे २०२४ला सुरू झालेल्या लव्हस्टोरीचा २५ ऑगस्ट २०२६ला धक्कादायक शेवट? चिखलीच्या शेतकरी पित्याचा पोलीस ठाणे ते हायकोर्टपर्यंतचा थरारक प्रवास! पित्याला मुलीची भेट होईल का?

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी घरापासून दूर गेलेली २० वर्षीय तरुणी... अचानक संपर्काबाहेर गेलेली मुलगी... तिच्यासोबत असलेल्या तरुणाचाही ठावठिकाणा नाही... आणि मुलीच्या शोधासाठी हवालदिल झालेला बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीचा शेतकरी पिता थेट पोलीस ठाण्यापासून उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला! तब्बल वर्षभर सुरू असलेल्या या कथित ‘लव्हस्टोरी’चे पुढे काय झाले? हा प्रश्न आता अधिकच गंभीर बनला आहे. कारण मुलीला फूस लावून पळवून नेऊन कुठेतरी डांबून ठेवल्याच्या संशयावरून तिच्या कथित प्रियकराविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याची मुलगी स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी मार्च २०२४ पासून छत्रपती संभाजीनगरमधील नूतन कॉलनी परिसरातील हॉस्टेलमध्ये राहत होती. सुरुवातीला ती आई-वडिलांशी नियमित फोनवर बोलत होती. २७ मे २०२४ रोजी रात्री सुमारे ९ वाजता झालेला फोन हा तिचा कुटुंबीयांशी शेवटचा नियमित संपर्क ठरला. त्यानंतर फोन बंद येऊ लागला. हॉस्टेलकडे चौकशी केली असता ती २६ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हॉस्टेलमधून बाहेर गेल्याचे समोर आले. मात्र ती चिखलीतील घरीही पोहोचली नव्हती.

कुटुंबीयांनी छत्रपती संभाजीनगरला धाव घेत तिच्या मैत्रिणी, हॉस्टेल आणि परिचितांकडे शोधाशोध केली. अखेर क्रांती चौक पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. शोध सुरू असतानाच एका मैत्रिणीकडून धक्कादायक माहिती मिळाल्याचे वडिलांचे म्हणणे आहे. रोहित राजपूत नावाचा तिचा मित्र तिला काहीतरी आमिष दाखवून घेऊन गेला असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर रोहितचाही शोध सुरू झाला; मात्र त्याचाही ठोस ठावठिकाणा लागला नाही.

मुलगी आणि रोहित दोघेही सापडत नसल्याने अखेर २५ सप्टेंबर २०२५ रोजी चिखलीच्या या पित्याने छत्रपती संभाजीनगर खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. याचिकेत रोहित राजपूतसह त्याच्या सहा नातेवाइकांवर संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही रोहित आणि त्याचे नातेवाईक हजर राहत नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे मुलीच्या वडिलांचा संशय अधिकच बळावला.‘ही लव्हस्टोरी नसून मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार आहे का?’ असा सवाल आता या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे. रोहितने मुलीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावली आणि वाईट हेतूने तिचे अपहरण करून तिला कुठेतरी डांबून ठेवले असल्याचा संशय व्यक्त करत वडिलांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा क्रांती चौक पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोहित राजपूतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, २५ मे २०२४पासून सुरू झालेल्या या कथित लव्हस्टोरीचा नेमका शेवट काय? तरुणी कुठे आहे? रोहित राजपूत नेमका कुठे गायब झाला? आणि वर्षभरानंतरही दोघांचा ठावठिकाणा का लागला नाही? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहेत. चिखलीतील या शेतकरी पित्याला आपल्या मुलीची भेट पुन्हा कधी होणार? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे..