कुलरच्या वायरचा शॉक जीवावर बेतला! पोटळीतील ४६ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गावात हळहळ
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास लताबाई यांच्या घरी बांधकाम सुरू होते. याचवेळी घरातील कुलरच्या वायरचा त्यांना अचानक जोरदार विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का इतका तीव्र होता की, त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकांनी त्यांना तातडीने नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल शिंदे यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्राचे परिचर प्रफुल्ल वसंता वानखडे (वय ३१) यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा एमएलसी मेमो नांदुरा पोलीस ठाण्यात सादर केला. त्यावरून पोलिसांनी मर्ग क्रमांक ५८/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक सोळंके पुढील तपास करीत आहेत.