उभ्या असलेल्या ट्रकवर स्कुटी आदळली; डाॅक्टर ठार तर मुलगा गंभीर; नसराबाद फाट्याजवळील घटना; मृतक डाॅक्टर सिंदखेड राजा शहरातील !
 Nov 4, 2025, 11:32 IST
                                            
                                        
                                    सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरधाव स्कुटी उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने सिंदखेड राजा शहरातील खासगी  डाॅक्टरांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना ३ नाेव्हेंबर राेजी रात्री आठ वाजता नसराबाद फाट्याजवळ घडली.  डॉ. प्रकाश किसन चौधरी (वय ६०) असे मृतक डाॅक्टरांचे नाव आहे तर त्यांचा मुलगा अनमोल प्रकाश चौधरी (वय २५) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 
सिंदखेड राजा येथील रहिवासी डॉ. प्रकाश किसन चौधरी  हे त्यांचा मुलगा अनमोल प्रकाश चौधरी यांच्यासोबत जालन्याहून काम आटोपून सिंदखेड राजा शहराकडे येत होते. दरम्यान नसराबाद फाट्याजवळील हॉटेल जगदंब समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला डॉ. प्रकाश चौधरी यांच्या स्कुटीने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, 
                                    डॉ. प्रकाश चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात स्कुटी चालवत असलेला त्यांचा मुलगा अनमोल प्रकाश चौधरी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
 अपघाताची माहिती मिळताच सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष इंगळे,
 ज्ञानेश्वर दहातोंडे आणि विकास राऊत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि तत्काळ १०८ रुग्णवाहिकेला बोलावून अपघातग्रस्तांना मदत केली. डॉ. प्रकाश चौधरी यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी ठेवण्यात आला आहे. या अपघाताबाबत ठाणेदार आशिष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
