रेतीमाफियांचा घात; रस्त्यावर सांडलेल्या रेतीमुळे भीषण अपघात; रेतीवर घसरून एक कार थेट नदीत, दुसरी कठड्याला धडकली एअरबॅगमुळे चालकाचा जीव वाचला; तिघे किरकोळ जखमी !
रेतीमुळे ब्रेक न लागल्याने कार नदीत
नांदुराहून बुलढाण्याकडे निघालेल्या दोन कार २५ डिसेंबरच्या रात्री मोताळा–नांदुरा मार्गावरील वरूड फाट्याजवळील पुलावर पोहोचल्या असता रस्त्यावर साचलेल्या रेतीमुळे अपघात झाला.
एमएच-०४-जीडी-८२४५ क्रमांकाच्या कारला ब्रेक न लागल्याने ती थेट पुलावरून नदीत कोसळली. या कारमधील चालक अरुण राजगुरे हे एअरबॅग उघडल्यामुळे सुदैवाने बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली.
दरम्यान, एमएच-१९-सीएपी-००६९ क्रमांकाची दुसरी कार पावणेदहाच्या सुमारास वरूड फाटा वळणावर रेतीवर घसरून पुलाच्या कठड्याला धडकली. या कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, त्यात दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती आहे.
पोलिसांचा तातडीचा प्रतिसाद; जखमींना उपचार
या घटनेची माहिती वरूड येथील प्रसाद जुनारे व त्यांचे बंधू तसेच शेतकरी फाटे यांनी बोराखेडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेती साचलेली असल्याचे निदर्शनास आले.
जखमींना १०८ रुग्णवाहिकेद्वारे बुलढाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
पोलिस व ग्रामस्थांनी मिळून रस्ता केला साफ
पुढील अपघात टाळण्यासाठी बोराखेडी येथील एपीआय व पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने हवेच्या दाबाचा ब्लोअर असलेला ट्रॅक्टर मागवून रस्त्यावरील रेती हटविली.
या कामात पोलीस कर्मचारी बालाजी शेंगेपल्लू, नंदकिशोर धांडे, वैभव खरमडे, मनोहर पंडित, ज्ञानेश्वर धामोडे, तसेच वरूड, तांदुळवाडी, शेंबा येथील ग्रामस्थ आणि मोताळा येथील सोपान धोरण, बाळू धोरण व त्यांच्या कुटुंबीयांनी सहकार्य केले.
