नांदुऱ्यातून खामगाव आणि शेगावात तलवारींचा पुरवठा करण्याचा डाव पोलिसांनी उधळला! नांदुऱ्यानंतर खामगावातही तलवारी जप्त...
याच नांदुरा कारवाईनंतर आज शेगाव शहर, खामगाव शहर आणि शिवाजीनगर पोलीस हद्दीत मिळून १९ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. नांदुर्यातील शेख वसीम शेख सलीम याच्याकडून २० ऑगस्ट रोजी जप्त केलेल्या तलवारींसह शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला आणि आरोपीला अटक केली होती. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान वसीम याने खामगाव आणि शेगाव येथे तलवारींचा पुरवठा केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासात समोर आले की शेख इरफान शेख भिकारी कुरेशी (रा. नांदुरा) याच्यामार्फत खामगावच्या अब्दुल इमरान अब्दुल जलील (वय २५, रा. मेहबूब नगर, चांदमारी घरकुल) याने १३ ऑगस्ट रोजी तलवारी विकत घेतल्या होत्या. तसेच, शेख नदीम शेख सरदार (रा. मेहबूब नगर, खामगाव) याने आपल्या ऑटो (क्र. एमएच ४८ एन २०२९) ने नांदुर्यातून तलवारी खामगावमध्ये आणल्या होत्या.
आज २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पोलिसांनी अब्दुल इमरान अब्दुल जलील यांच्या घरी छापा टाकून घराची झडती घेतली. त्यामध्ये ८२ सेंटीमीटर लांबीच्या एकूण सात धारदार तलवारी (किंमत १४ हजार रुपये) मिळून आल्या आहेत. पोलिसांनी तलवारींसह इतर असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासह शिवाजीनगर पोलीस हद्दीतील बर्डे प्लॉट आणि शेगाव शहर पोलीस हद्दीतून आणखी १२ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.