

नायलॉन मांजा जिवावर उठला; माजी नगरसेवकाचा गळा चिरला; नांदुऱ्याची घटना...
Dec 31, 2024, 08:50 IST
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):नायलॉन मांजाने माजी नगरसेवकाचा गळा चिरल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. त्यांच्यावर नांदुरा येथे प्रथमोपचार करून मलकापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
पंधरा दिवसांवर आलेल्या मकरसंक्रांत सणासाठी बच्चे कंपनी पतंग उडविण्यात मश्गुल झाले आहेत; मात्र आता पतंग उडविण्यासाठी लहान मुले घातक नायलॉन मांजाचा वापर करीत असल्याने मांजामुळे गंभीर दुखापत होण्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकार २९ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजे दरम्यान खामगाव रोडवरील मोहता हॉस्पिटल जवळ घडला. कोठारी लेआउट मधील माजी नगरसेवक महेश रमणलाल चांडक (५०) हे मोटरसायकलने शहरातील कामे आटोपून घराकडे परतत असताना मोहता हॉस्पिटलनजीक त्यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकल्याने गळा चिरून गंभीर दुखापत झाली. चिरलेला गळा पाहत असतात दैव बलवत्तर म्हणून चांडक यांचे प्राण वाचले, त्यांना उपचारासाठी प्रथम येथील खासगी रुग्णालयात भरती केले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मलकापूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.