आकडा उरात धडकी भरवणारा! जानेवारीच्या ३० दिवसांत जिल्ह्यातून ७० मुली बेपत्ता...! कुठे गेल्या? काय झालं त्यांचं.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांचे प्रमाण काही कमी होतांना दिसत नाही.. विशेषतः लग्नसराई सुरू झाल्यानंतर हा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. आता जानेवारीच्या ३० दिवसात बुलढाणा जिल्ह्यातून ७० मुली ,महिला गायब झाल्या आहेत. विशेष म्हणजे आता यात विवाहित महिलांचे प्रमाण देखील वाढत आहे...

   बुलढाणा जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यात ७० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. बेपत्ता झालेल्यापैकी बहुतांश अविवाहित आहेत. तर काही विवाहित महिला देखील गायब झाल्या आहेत. बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये १८ ते २५ या वयोगटातील तब्बल ४८ मुलींचा समावेश आहे. या मुली कुठे गेल्या? त्यांचे काय झाले , त्या कुठे जातात याबद्दल बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत.मात्र बेपत्ता झालेल्या मुली सज्ञान असल्याने पोलीस प्रशासन या आकड्याला गांभीर्याने घेताना दिसत नाही..
वैवाहित अडचणीमुळे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढते..
दरम्यान महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सामाजीक कार्यकर्त्या सौ. अरूणा वायचाळ म्हणाल्या की, बेपत्ता होणाऱ्या मुलींमध्ये योग्य ठिकाणी विवाह न होण्याचे कारण आहे. बहुतांश मुली या प्रियकरा सोबत पळून जातात. घरच्यांचा लग्नाला असलेला विरोध हे एक मोठे कारण असल्याचे ते म्हणाल्या. शिवाय काही मुली लग्न झाल्यानंतर देखील आधीच्या प्रियकरासोबत पळून गेल्याच्या घटना आहेत.यात पालकांची जबाबदारी मोठी आहे. आपल्या मुलींच्या आवडीनिवडी यावर पालकांचे लक्ष असले पाहिजे. मुलगी म्हणते तो मुलगा जर चांगला आणि सुशिक्षित असेल तर त्याच्यासोबत तिचे लग्न लावून द्यायला हरकत नसावी असेही त्या म्हणाल्या.