जळक्या लोकांची संख्या वाढली! भाजप नेते तथा कीर्तनकार मधुकर वाघ यांच्या १५ एकर शेतातील मक्याच्या गंजा पेटवल्या... अमोना येथील घटना

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्ली जळक्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असल्या जळक्या लोकांना कुणाची प्रगती सहन होत नाही, स्वतः तर काही करता येत नाही मात्र दुसऱ्यांनी मेहनतीने मिळवलेले यश देखील जळक्या लोकांना पचवता येत नाही. जिल्ह्यात सोयाबीन सुडी पेटवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे, बहुतांश घटना पोलीस तपासात समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे जळक्या लोकांची हिंमत वाढते आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी चिखली तालुक्यातील अमोना येथे संतापजनक घटना समोर आली आहे. भाजपा अध्यात्मिक आघाडीचे नेते तथा ज्येष्ठ कीर्तनकार मधुकर वाघ यांच्या शेतातील मक्याची गंजी अज्ञात भामट्यांनी पेटवून दिली आहे. 
शनिवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुणीतरी जळक्या प्रवृत्तीच्या लोकांनी ही गंजी पेटवली. मधुकर वाघ यांच्या १५ एकर शेतातील ३ मक्याच्या गंजा पेटवण्यात आल्याची तक्रार अंढेरा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अशा घटनांचा पोलिसांनी ताबडतोब तपास करून आरोपीला जेरबंद करावे अशी मागणी समोर येत आहे.