मित्राचे लग्न आटोपून घरी जातांना मोटारसायकल बैलगाडीवर धडकली! तरुणाचा मृत्यू; धाडजवळ झाला अपघात...

 
 धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): छत्रपती संभाजीनगर-बुलढाणा रस्त्यावरील सातगाव म्हसला फाट्याजवळ बैलगाडीला लग्नाहून परतणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. १३ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजेदरम्यान ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक मधुकर गैणजी पुंगळे रा. डोणगाव ता. जाफराबाद जि. जालना हा बुलढाणा तालुक्यातील दहिद बुद्रुक येथून मित्राचे लग्न लागल्यावर दुचाकीने मित्रा सोबत एमएच ०३-सीपी ७९९३ या क्रमांकाच्या दुचाकीने घरी परत जात होता. सातगाव म्हसला फाट्यावर बैलगाडीला दुचाकीने धडक दिली. त्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही गंभीर जखमी झाले. जखमींना धाड येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. परंतु दुचाकी चालक मधुकर गैणजी पुंगळे (वय ३५) यांना मृत घोषित करण्यात आले. त्याच्यासोबत असलेले मित्राला किरकोळ मार लागलेला होता.
अपघाताची माहिती मिळताच धाड पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे व पोलीस नाईक देशमाने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर घटनेचा पंचनामा केला. मृतकाचे भाऊ सुदाम पुंगळे रा. डोणगाव ता. जाफराबाद जि. जालना यांच्या फिर्यादीवरून अज्ञात बैलगाडी चालकाविरुद्ध कलम १०६, (१), २८१ भारतीय न्याय संहिता अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी मृतकाचे शवविच्छेदन करुन धाड पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. घटनेचा पुढील तपास धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक समाधान देशमाने करीत आहेत.