सावकाराने छळले ! मजुराची आत्महत्या! ६ हजार व्याजाने दिले, ४० हजार घेऊनही सव्वा लाख मागितले....मलकापुरात धक्कादायक घटना! कुटुंबीयांनी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात...

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : धरणगाव (ता. मलकापूर) येथील ५० वर्षीय शिवाजी घुगरे यांनी व्याजाच्या पैशावरून झालेल्या वादातून विष प्राशन करून आत्महत्या केली. मृत्यू नंतर गुन्हा दाखल झाला असतानाही आरोपीस अटक न झाल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी ६ जून रोजी मृतदेह थेट मलकापूर पोलिस ठाण्यात आणत खळबळ उडवून दिली.

 
प्राप्त माहितीनुसार, शिवाजी सुपडा घुगरे (वय ५०, रा. धरणगाव) यांनी गावातीलच एका व्यक्तीकडून ६ हजार रुपये व्याजाने पैसे घेतले होते. या ६ हजार रुपयांचे सावकार अभिषेक कापसे याने ४० हजार वसूल केले. मात्र तो तब्बल सव्वा लाख रुपये मागत होता. ३ जूनच्या रात्री सावकार अभिषेक कापसे शिवाजी सुपडा यांच्या घरी वसुलीसाठी केला. त्यांना बाहेर बोलावून मारहाण देखील केली. बाहेर नागरिकांच्या समक्ष मारहाण झाल्याची बाब शिवाजी सुपडा यांच्या जिव्हारी लागली. यातूनच नैराश्यातून त्यांनी चार जूनच्या रात्री विषारी औषध प्राशन केले. तत्पूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली.
गंभीर अवस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना बुलढाणा येथे हलविण्यात आले. तिथे ५ जूनच्या रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी जयश्री शिवाजी घुगरे यांच्या फिर्यादीवरून अभिषेक सुनील कापसे (रा. धरणगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ६२, ११५(२), ३५१(२) अंतर्गत मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपीस अटक करण्यात दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ मृतकाचा मृतदेह ६ जून रोजी थेट मलकापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आला होता.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासनावरही दबाव वाढला आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास मलकापूर पोलिस करीत आहेत.