अपहरणानंतर निर्घृण खून करणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड अखेर जेरबंद; दीड वर्ष फरार असलेल्या अमोल राजपूतला छत्रपती संभाजीनगरातून केले गजाआड; बुलढाणा एलसीबीची थरारक कामगिरी...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अपहरण करून निर्घृण खून करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दीड वर्षांपासून फरार असलेला आरोपी अमोल जयसिंग राजपूत (वय ३८, रा. इंदिरा नगर, वार्ड क्र. ०४, जानेफळ) यास स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन जानेफळ येथे भादंवि कलम ३०२, १२०(ब), ३६४, ३६५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. फिर्यादी सौ. ज्योती दिलीप इंगळे (वय ३५, रा. इंदिरा नगर, जानेफळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ जून २०२४ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांचे पती दिलीप इंगळे (वय ४५) यांचे अपहरण करण्यात आले होते.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अमोल राजपूत व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून दिलीप इंगळे यांचे जानेफळ येथून अपहरण केले व त्यांना अहमदनगर येथे नेऊन निर्घृणपणे ठार मारले. या गुन्ह्यात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून अमोल राजपूत हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा केल्यानंतर अमोल राजपूत हा सतत वेशभूषा बदलून, स्वतःची ओळख लपवत छत्तीसगड, चंदीगड, कर्नाटक, दिल्ली अशा विविध राज्यांत वास्तव्यास होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक विश्लेषणातून २७ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी चंदीगडहून छत्रपती संभाजीनगर येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सतत पाठलाग करून, तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ६ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल राधिका इन, पॅराडाईज चौक येथून त्याला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणीक लोढा व अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दीपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले, मपोका आशा मोरे, चापोका निवृत्ती पूड तसेच तांत्रिक विश्लेषण विंगचे पोहेकॉ राजू आडवे, ऋषिकेश खंडेराव, कैलास ठोंबरे व पवन मखमले यांनी मोलाची भूमिका बजावली.