लग्न ठरलं, साखरपुडाही झाला...साखरपुड्यात ७ –८ लाखांचा खर्च! पण नंतर समोर आलं धक्कादायक वास्तव; सहा जणांवर गुन्हा! खामगावची घटना

 
 खामगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विवाहाचे गोड स्वप्न दाखवत एका तरुणीला विश्वासात घेतल्यानंतर लाखो रुपयांचा खर्च करवून घेतला आणि त्यानंतर हुंड्यासाठी दबाव टाकत मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेची शहरात मोठी चर्चा सुरू आहे. फिर्यादीनुसार, पीडित तरुणीच्या विवाहासाठी नातेवाईकांमार्फत स्थळ आले होते. संबंधित युवक भारतीय सैन्यात कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. ओळख वाढल्यानंतर दोन्ही कुटुंबांची भेट झाली आणि विवाह निश्चित करण्यात आला. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी खामगाव-शेगाव मार्गावरील एका हॉटेलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमासाठी हॉटेल, जेवण, फोटोग्राफी, कपडे आणि इतर खर्च मिळून सुमारे सात लाख रुपये खर्च झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मात्र, साखरपुड्यानंतर आरोपींकडून तब्बल ११ लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. ही मागणी पूर्ण केली नाही तर मुलीच्या वयाबाबत, शिक्षणाबाबत चुकीची माहिती समाजात पसरवून बदनामी करण्याची धमकी दिली गेल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या सततच्या दबावामुळे तरुणीला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे खामगाव शहर पोलिसांनी कपिल सिद्धार्थ पांडे, सिद्धार्थ मनोज पांडे, जिजाबाई सिद्धार्थ पांडे, सुरेश वामन तायडे, सोनल विजय पानपाटील आणि कमला रमेश इंगळे या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक विद्यूत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.