मेहकरात मांडला होता वासनेचा बाजार! हॉटेलच्या बाहेर पाटी व्हेज नॉनव्हेजची; आत चालू होता देहाचा व्यापार... मेहकर पोलिसांचा छापा! हॉटेल मालकांना अटक
May 28, 2026, 10:52 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्हेज-नॉनव्हेजच्या पाटीआड महिलांच्या देहाचा बाजार मांडणाऱ्या हॉटेल शिवराजचा बुरखा मेहकर पोलिसांनी बुधवारी टराटरा फाडला. डोणगाव रोडवरील या कुप्रसिद्ध वाइनबारवर ठाणेदार व्यंकटेश आलेवार यांच्या पथकाने थेट धाड टाकत कुंटणखान्याचा पर्दाफाश केला.
गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून नरकात ढकलणाऱ्या हॉटेल मालक प्रमोद धोंडगे (४८) आणि त्याचा साथीदार विजय लादे (३६) यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडून बेड्या ठोकल्या. पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिक या 'गंदा धंद्या'ला वैतागले होते. गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांच्या मुसक्या आवळल्या. हा मेहकर पोलिसांचा दुसरा दणका आहे. - याआधी बायपास रोडवरील हॉटेलचा अड्डाही पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता.