न्यायाच्या मंदिरातच भ्रष्टाचाराचा बाजार! दिवाणी न्यायालयाचा बेलीफ १० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; मेहकरात खळबळ!

 १५ हजारांची मागणी, १० हजारांत 'डील'; न्याय विकण्याचा प्रयत्न महागात, बसस्थानक परिसरातून रंगेहात अटक....

 
 मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): न्याय मिळावा म्हणून सर्वसामान्य नागरिक न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो. मात्र, न्यायाच्या मंदिरातच लाचेचा बाजार मांडण्याचा धक्कादायक प्रकार मेहकरमध्ये उघडकीस आला आहे. दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ स्तरावरील बेलीफला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने न्याय व्यवस्थेलाच काळिमा फासणारी घटना घडली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, जगदीश सुखदेव राऊत (वय ३१, रा. माळीपुरा, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा) हे मेहकर येथील दिवाणी न्यायालयात बेलीफ म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराविरुद्ध सुरू असलेल्या दिवाणी दाव्यातील जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट न बजावता परत करण्यासाठी राऊत यांनी तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. न्यायालयीन प्रक्रियेलाच पैशांच्या तराजूत तोलण्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर तक्रारदाराने बुलढाणा एसीबीकडे धाव घेतली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ६ ऑगस्ट रोजी दुपारी न्यायालयाच्या आवाराबाहेर पुन्हा पैशांबाबत चर्चा झाली. अखेर १५ हजारांवरून १० हजार रुपयांत तडजोड झाली. त्यानंतर दुपारी सुमारे २.१५ वाजता मेहकर बसस्थानक परिसरात राऊत यांनी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात जेरबंद केले.या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक बापू बांगर आणि बुलढाणा उपअधीक्षक भागोजी चोरमुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार तसेच पोलीस कर्मचारी शैलेश सोनवणे, पंढरी शेळके आणि नितीन शेटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.सर्वसामान्य नागरिक न्यायासाठी न्यायालयात जातो; पण त्याच न्यायालयातील कर्मचारी जर न्यायाची किंमत ठरवू लागले, तर ही केवळ लाचखोरी नसून न्यायव्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासावरच घाला आहे. अशा भ्रष्ट प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे हीच काळाची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.